नाशिक : गंगापुररोडवरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांसोबत रस्त्याच्यालगतच्या झाडांवरही बुलडोझर चालविण्यात येत असल्याचा दावा वृक्षप्रेमींनी मनपा आयुक्तांकडे बैठकीत केला. आयुक्तांनी सोमवारी (दि.३) गंगापुररोडवरील वृक्षतोडीच्या कार्यवाहीचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन बैठकीप्रसंगी दिले.गंगापुररोडवरील वृक्षतोडीच्या कार्यवाहीमध्ये रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांसह ज्या वृक्षांचा वाहतुकीला अडथळा नाही, अशा झाडांवरही कुऱ्हाड चालविली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी कोणतेही झाड तोडू नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना मनपाकडून शनिवारी रात्री गंगापुररोडवरील काही झाडे रात्रीतून तोडण्यात आल्याचा दावा वृक्षप्रेमींनी केला आहे. याबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी वृक्षप्रेमी आश्विनी भट, भारती जाधव, योगेश शास्त्री, जसबीर सिंग आदिंनी रविवारी (दि.२) आयुक्त अभिषेक कृष्ण यांची निवास्थानावर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत वृक्षप्रेमींनी आयुक्तांकडे तक्रार करत नियमबाह्यपणे वृक्षतोडीची कार्यवाही होत असल्याचे सांगत आपण तातडीने याबाबत पाहणी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
गंगापुररोडवरील वृक्षतोडीचे सर्वेक्षण करणार : अभिषेक कृष्ण
By admin | Updated: April 2, 2017 20:48 IST