नाशिक : विदर्भापासून ते कोकणापर्यंत मी महाराष्ट्राचा दौरा केला असून, मला येथे मराठी-उर्दूचा अनोखा संगम बघावयास मिळाला. मुळात उर्दू ही भाषा कोणा एका जातीची किंवा धर्माची आहे हा निव्वळ गैरसमज आहे. उर्दू ही भारतीय भाषा असून, ती नेहमी भारतीयच राहील यात शंका नाही. मराठी-उर्दूचे अतुट नाते असून, हे नाते कोणीही राजकीय ‘सर्जन’ तोडू शकत नाही, असे मुंबई येथील ज्येष्ठ शायर अब्दुल अहद साज यांनी शायरीच्या शैलीत ठणकावून सांगितले.शहरातील उर्दू शायर फकिर महंमद ऊर्फ नासिर शकेब यांचा पाचवा उर्दू गझलसंग्रह ‘दर्द आश्ना’ हा देवनागरी भाषेतून प्रकाशित करण्यात आला. गंगापूररोड परिसरातील ‘हमसफर’च्या कलादालनात झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अब्दुल अहद प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अॅड. नंदकिशोर भुतडा, राकेश माहेश्वरी, डॉ. अशोक पिंगळे, खान जाकिर, नासिर शकेब उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, उर्दू-मराठी या दोन्ही भाषा सख्ख्या जुळ्या बहिणींसारख्या आहेत. यांचा श्वास एकमेकांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात उर्दूचा विस्तार झाला तो हिंदी-मराठी भाषांच्या आधारावरच. त्यामुळे उर्दूला मराठीपासून वेगळे करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शकेब यांनी यावेळी मनोगतातून शायरीचे महत्त्व विशद केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते ‘दर्द आश्ना’ गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी कव्वाली, गझल संगीताची सुरेख मैफल रंगली. यावेळी अॅड. प्रिया भुतडा, श्वेता भुतडा, निशिगंधा यांनी भर दो झोली मेरी.... ही कव्वाली, आज जाने की जिद ना करो...ही गझल, तसेच तेरी दिवानी... हे गीत सादर करत उपस्थित उर्दूप्रेमी श्रोत्यांना मुग्ध केले. प्रास्ताविक भुतडा यांनी केले. (प्रतिनिधी)
राजकीय ‘सर्जन’ उर्दू-मराठीचे नाते तोडू शकत नाही
By admin | Updated: October 4, 2015 22:54 IST