महापालिकेतील भाजपत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाद पराकोटीला पोहोचले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत तर सत्तांतर होण्याची तयारी होती. विरोधकांना एक गट जाऊनही मिळाला होता, त्याच गटाला आता संधी दिल्याने दुसऱ्या गटाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारदेखील केल्याचे कळते. काही महिन्यांपूर्वीच सध्याचे सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांना हटविण्याच्या हालचाली झाल्या होत्या; मात्र नंतर त्या थंडावल्या असल्या तरी आता अचानक त्या सुरू झाल्या. महासभा सुरू असताना शहराध्यक्ष गिरीश पालवे हे पत्र घेऊन स्थायी समिती सभापतींच्या दालनात आले आणि तेव्हापासून राजकीय घडामोडी घडत गेल्या. एका गटाने माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना तर दुसऱ्या गटाने नियुक्तीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे एकदा सभागृह नेता बदलण्याचा आणि दुसऱ्यावेळी दोन्ही बदल पुढील महासभेत करण्याचे देखील ठरवण्यात आले; मात्र नंतर महापाैरांना प्रदेश नेत्यांचे फोन आले आणि सोमवारीच निवडीवर शिक्कामेार्तब करण्यात आले. महासभा संपल्यानंतर दोन्ही पदांची घोषणा करतानाच महापौरांनी बोडके आणि पवार यांचा सत्कार केला.
कमलेश बोडके आणि अरुण पवार हे देाघे पंचवटीतील आहेत. स्थायी समितीचे विद्यमान सभापती गणेश गीते हे देखील पंचवटीतील असून या आधीच्या महापौर रंजना भानसी देखील पंचवटीच्याच असल्याने केवळ पंचवटीतच पदे का असा प्रश्न अन्य नाराजांनी व्यक्त केला आहे.
इन्फो...
सोनवणे यांनी दिला राजीनामा
पद बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी तत्काळ पदाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. सभागृहनेतेपदी अन्य कोणाला संधी द्यावी यासाठी हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.