पंचवटी : पोलीस असल्याची बतावणी करून तिघा संशयितांनी महिलेच्या अंगावरील सुमारे ७० हजार रुपयांचे दागिने काढून घेतल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील महाजननगर येथे राहणाऱ्या पुष्पा नरहर देसले (६५) या रविवारी सकाळच्या सुमारास पती व नातवासोबत राजमाता मंगल कार्यालयाजवळ राहणारा मुलगा राजू देसलेकडे जात होत्या़ अकरा वाजेच्या सुमारास रिक्षामधून उतरून पायी जात असताना दुचाकीवर दोघे संशयित आले़ त्यांनी या तिघांना दरडावण्याच्या सुरात आवाज देतो ऐकू येत नाही का? जवळच राहणाऱ्या रमेश शिंदे नावाच्या व्यक्तीच्या घरी चोरीची घटना झाल्याचे सांगून नरहर देसले यांच्या खिशातील कागदपत्रे व मोबाइलची तपासणी केली़ या दोघा संशयितांनी रस्त्याने जाणाऱ्या एकास अडवून त्याची चौकशी केली असता त्याने चौकशी करणारे तुम्ही कोण अशी विचारणा केली असता पोलीस असल्याचे आयकार्ड दाखविले व गळ्यातील सोन्याची चेन रुमालात ठेवण्याचा सल्ला दिला़ संबंधित व्यक्ती गेल्यानंतर नरहर देसले यांना खिशातून रुमाल काढण्यास सांगून त्यामध्ये पत्नीच्या अंगावरील दागिने ठेवण्यास सांगितले़ त्यानुसार पुष्पा देसले यांनी गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने रुमालात ठेवले़ यानंतर ते तपासणीच्या नावाखाली दागिने पिशवीत ठेवल्याचा बहाणा करून आरडाओरड न करता घरी जाण्याचा सल्ला दिला़ देसले दांपत्य थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी शंका आली म्हणून दागिन्यांची तपासणी केली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी पोलिसांत धाव घेतली़ या प्रकरणी पुष्पा देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांत तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढून घेतल्
By admin | Updated: November 10, 2014 01:03 IST