सिन्नर : येथील शिवाई दवाखान्यासमोर हॉर्न वाजवून त्यानंतर डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले.शनिवारी सायंकाळी डॉ. सदगीर यांच्या शिवाई हॉस्पिटलसमोर स्विफ्ट कारमधून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्राने हॉर्न वाजविण्यास प्रारंभ केला. दवाखान्यातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व डॉ. वैभव सदगीर यांनी दवाखान्यातील रुग्णांना त्याचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. तेव्हा वावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई रवींद्र बारहाते व त्याचा मित्र याने डॉ. वैभव सदगीर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. आम्ही पोलीस आहोत, आमचे कोणीही काही करू शकत नाही असे ते ओरडून सांगत होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांना उभेही राहता येत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यांना गाडी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी डॉ. वैभव सदगीर यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर सदर संशयित आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे वैद्यकीय संघटनेचे म्हणणे आहे. सदर पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होते,े असा आरोप संघटनेने केला आहे. संशयित दोघा पोलिसांवर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. या दोघांवर आरोग्य सेवा संरक्षण २००९ च्या कायद्याप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुरुळे, उपाध्यक्ष डॉ. गोविंद गारे, डॉ. संदीप शिंदे, डॉ. प्रशांत गाढे, डॉ. बी. एन. नाकोड, डॉ. अभिजित काकडे, डॉ. अभिजित सदगीर, डॉ. अजित खालकर, डॉ. राहुल लोंढे, डॉ. प्रताप पवार, डॉ. संदीप गुंजाळ, डॉ. आर. डी. नाईकवाडी, डॉ. पंकज नावंदर, डॉ. योगेश उगले, डॉ. दीपक आव्हाड यांच्यासह संघटनेचे सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)
दवाखान्यासमोर पोलिसांचा धिंगाणा
By admin | Updated: September 22, 2015 22:40 IST