इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात परस्पर नेमले जाणारे भाडेकरू, तसेच टवाळखोरांचा वाढता उपद्रव याबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याला जाग आली असून, या भागात त्यांनी गस्त वाढवली आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पांडवनगरी परिसर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत विकसित झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून या ठिकाणी गृहनिर्माण संस्था उभ्या राहिल्या आहेत. याभागात सुमारे चारशे सदनिका आहेत. मात्र, ७० टक्के सदनिकांमध्ये भाडेकरू राहतात. ज्यांच्या मालकीच्या सदनिका आहेत, असे सरकारी कर्मचारी बदलीमुळे येथे अन्यत्र आहेत. काहींची स्वत:ची घरे अन्य जिल्ह्यात आहेत त्यामुळे ते येथे राहण्यास येण्यास तयार नाहीत. अशा कर्मचाऱ्यांनी दलालांमार्फत भाडेकरूंना घरे दिली आहेत. विशेष म्हणजे ही घरे देताना सरकारी कर्मचाऱ्यांना कोण भाडेकरू आहेत यांची माहिती नाही. केवळ दलालांनी अनामत रक्कम आणि भाड्याची रक्कम जप्त केली की, कोणाला सदनिका दिली आहे, याची माहिती ते स्वत:च घेत नाही. पोलीस ठाण्यांना भाडेकरूची माहिती देणे तर दूरच राहिले. तशातच या भागातच काही सोसायट्यांमध्ये अवैध प्रकार सुरू झाल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार होती. तक्रार करणाऱ्यांच्या घरावर दगडफेक करणे किंवा अन्य नुकसान करण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकही हतबल झाले.याबाबत लोकमतने हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून याभागात गस्त वाढविली असून काही टवाळखोरांवर कारवाईही केली आहे. दरम्यान भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असून त्यानुसार नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पांडवनगरी परिसरात पोलिसांची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:57 IST