नाशिक : मंजूर नकाशाप्रमाणे बांधकान न करता बेकायदेशीरपणे बांधकाम करून एकाच फ्लॅटचे दोन फ्लॅट दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बाफणा बिल्डर्स अॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक सुशीलकुमार कस्तुरचंद बाफणा व अभय कांतीलाल तातेड यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जयेश कृष्णकांत पारेख (रा. नयनतारा हिल्स, मायको सर्कलजवळ, नाशिक) यांनी याबाबत न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जयेश पारेख यांनी २००४ मध्ये मायको सर्कलजवळील अनमोल नयनतारा हिल्स या बाफणा बिल्डर्सच्या ३२ फ्लॅटच्या प्रकल्पात ६०२ क्रमांकाचा १ कोटी ३८ लाख ८० हजार रुपये किमतीचा १६६९ चौरस फुटाचा फ्लॅट बुक केला़ त्यामध्ये तीन बेड, हॉल व किचनचा समावेश असून, काही रक्कम टोकन म्हणून दिली़ बिल्डिंगच्या बांधकामानंतर त्यांच्या फ्लॅटला ६०२ व ६०२ अ असे वेगवेगळे क्रमांक देण्यात आले़ या फ्लॅटचे २००७ मध्ये करारनामा करतेवेळी ही बाब पारेख यांच्या लक्षात आली़ बिल्डरकडे याबाबत विचारणा केली असता आयकर योजनेसाठी दोन क्रमांक देण्यात आल्याचे सांगण्यात आले़ तसेच करारनाम्यातील एकाच कार पार्किंगबाबत विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली़ फ्लॅटचा ताबा घेतला त्यावेळी दुसरी पार्किंग दिली मात्र त्याची नोंद करारनाम्यामध्ये नव्हती़ यावर पारेख यांनी या प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली असता बांधकाम नकाशामध्ये फेरबदल करून फ्लॅटधारक व महापालिकेचीही फसवणूक केल्याचे समोर आले़ याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खासगी दाव्याबाबत न्यायालयाने बाफणा बिल्डर्सविरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
बाफणा बिल्डर्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Updated: February 15, 2017 00:48 IST