नाशिक : होली, रंगपंचमी म्हटली की सर्वांनाच रंगात रंगून जाण्याचा मोह होतो. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’लादेखील रंगात रंगण्याचा मोह आवरता आला नाही. पोलीस आयुक्तांसमवेत अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह रंगोत्सव साजरा केला.पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी शहराच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा ताण-तणाव कमी कसा करता येईल, या दृष्टिकोनातून विविध उपक्रम त्यांनी राबविले आहे. दरमहा कर्मचाऱ्यांचा वाढदिवस असो किंवा सिनेमागृहात एखादा सामाजिक बोध देणारा सिनेमाचा ‘शो’ असो यासह विविध सण-उत्सव देखील कर्मचाऱ्यांमध्ये मिळून-मिसळून सिंघल साजरे करत आहेत. याचा प्रत्यय सोमवारी (दि.१३) रंगपंचमीच्या निमित्ताने पुन्हा आला. पोलीस कवायत मैदानावरील बॅरेक क्रमांक १७च्या पटांगणात संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास होली खेले रघु वीरा...’ होली के दिन दिल मिल जाते हैं..., रंग बरसे भीगे चुनरवाली..., अशा एकापेक्षा एक सरस हिंदी गाण्यांवर थिरकत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकांवर रंगाची उधळण करीत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. सुमारे तासभर चाललेल्या या रंगोत्सवाने सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त केले. ताणतणावापासून दूर राहिल्यास पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल आणि त्याचा थेट फायदा शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी होणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले. यामुळेच पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये मिळून सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची संकल्पना आयुक्तालयात राबविली जात असल्याचे ते म्हणाले.
....रंगात रंगले पोलीस
By admin | Updated: March 13, 2017 20:50 IST