नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणच्या अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू केली आहे़ पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर छापेमारी करून अकरा संशयितांना ताब्यात घेतले असून, सुमारे अडीच लाख रुपयांचे मद्य जप्त केले आहे़ दरम्यान, मद्याची वाहतूक करणारी इंडिका कार सिडको परिसरातून ताब्यात घेण्यात आली आहे़सिडकोतील गणेश चौकात उभ्या असलेल्या कारमध्ये मद्यसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने विविध विकास मंडळ मैदानावर सापळा लावून संशयित दिनकर परशुराम भोगे (५१ रा.गणेश चौक) यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडील इंडिका कार (एमएच १५ डीएस ९१९३) मध्ये मोठा मद्यसाठा होता़ पोलिसांनी कारसह सुमारे दोन लाख १२ हजार ७८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़तर लेखानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी छापा टाकून संशयित अजय उद्धव कनकुटे (२१) याच्याकडून एक हजार ७५० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गंजमाळ परिसरातील भीमवाडी परिसरात संशयित निशाद रमेश शिरसाठ (रा. घारपुरे घाट) व ज्ञानेश्वर बाळू शेलार (रा. वावरे लेन) हे दोघे मद्य व भांग या नशेच्या विक्री करताना आढळून आले़ त्यांच्याकडून २४ हजार रुपये किमतीचा मद्य आणि भांग जप्त करण्यात आले असून, भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे पळसे येथील संशयित अनिल राठोड, कैलास जाधव व मिलिंद साळवे यांच्याकडून तेराशे रुपये किमतीचा देशी दारू जप्त करण्यात आली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सातपूरच्या जगतापवाडीतील संशयित किरण बन्सी थोरात या युवकाडून देशी दारूच्या ४२ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ओढा येथील संशयित पंकज मनोहर निकम याच्याकडून १० हजार २३५ रुपये किमतीच्या विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्रपाली झोपडपट्टीतील संशयित रामू गौंड याच्याकडून देशी दारूच्या २३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ म्हसरूळ पोलिसांनी पेठरोडवर कारवाई करून संशयित अनिल काकड या युवकाकडून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला.
पोलिसांची कारवाई; अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त
By admin | Updated: February 4, 2017 23:26 IST