सटाणा : बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी संजय चव्हाण यांना न्यायालयाने अपात्र ठरविले असताना राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यादेखील बोगस आदिवासी असल्याचा गौप्यस्फोट पक्षातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मधुकर पिचड यांनी केल्याने त्याचे रविवारी सटाणा शहरात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षामधील चव्हाण समर्थकांनी चक्क मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.पिचड यांच्या गौप्यस्फोटामुळे बागलाण तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील चव्हाण समर्थकांनी थेट पिचड यांच्यावरच हल्लाबोल केला. रविवारी संतप्त कार्यकर्त्यांनी सटाणा बसस्थानकासमोर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पिचड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पिचड हेच बोगस आदिवासी असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, वैभव गांगुर्डे यांनीही पिचड यांच्या निषेधार्थ भाषणे केली़ (वार्ताहर)
सटाण्यात स्वपक्षीयांकडूनच पिचड यांच्या पुतळ्याचे दहन
By admin | Updated: August 8, 2016 00:02 IST