पेठ : मार्च महिना सुरू झाल्यापासून पेठ शहरासह तालुक्याला पाणीटंचाईने भेडसावले असताना, पेठ शहरात विविध शासकीय कामे वा बाजाराच्या निमित्ताने येणाऱ्या हजारो नागरिकांची तहान भागविण्याचे काम पेठच्या महिलांनी केले असून, महिला मंडळाच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी पाणपोया सुरू करून नागरिकांची तहान भागवत आहेत.येथील महिला बचतगटाच्या शीतल रहाणे यांच्या संकल्पनेतून महिलांनी महिला बचतगटातील जमा झालेल्या एक महिन्याच्या बचतीतून पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यास सर्वच महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पेठच्या बलसाडरोड, खंडेराव चौक व बाजारपेठेत पाणपोया सुरू करण्यात आल्या़ पेठला खेड्यापाड्यावरून येणाऱ्या सामान्य नागरिकांना पेठ शहरात आल्यावर एकतर हॉटेलात काहीतरी पदार्थ विकत घेऊन पाणी प्यावे लागते किंवा पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत होती. या पाणपोयांमुळे त्यांची पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली आहे़ नुकताच जगभर साजरा झालेला महिला दिन अशा प्रकारे समाजसेवा करून या सावित्रीच्या लेकींनी साजरा केला़ यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे़याप्रसंगी शीतल रहाणे, वंदना डिंगोरे, संगीता रहाणे, सोनाली झोंगे, सुनीता चव्हाण, संगीता खेकाळे, सुरेखा गणोरे, अलका पेठकर, जनाबाई पठाडे, नलिनी गाडगीळ, रेखा वाडकर, लीलाबाई घोंगे, रेखा डोगमाने, रामेश्वरी घोंगे, जयश्री नेवकर, लता डोगमाने, चंद्रकला रहाणे, विमल रहाणे, लता वाघ यांच्यासह महिला बचतगटाच्या सदस्य उपस्थित होत्या़ (वार्ताहर)
पेठच्या सावित्रींची जलसेवा
By admin | Updated: March 20, 2016 23:42 IST