नाशिक : दृष्टीचा अभाव असला तरी दृष्टीबाधितांच्या इतर संवेदना, बुद्धिमत्ता व शारीरिक क्षमता सामान्य माणसाच्या तुलनेत अधिक असतात. त्यांना केवळ योग्य दिशा देण्याची गरज असते. समाजातील या घटकास सहानुभूती नव्हे तर सहकार्याचा हात हवा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
अंधध्वज दिनाचे (दि. १४) औचित्य साधून नॅब महाराष्ट्र आयोजित ध्वजदिन निधी संकलन अभियानाचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला. मुंबईत राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. राज्यपाल म्हणाले, नॅब युनिट महाराष्ट्र ही संस्था विशेष मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करते. त्यामुळे पालक या नात्याने मला संस्थेचा अभिमान वाटतो. कित्येकदा आपण सामान्य व्यक्ती छोट्या-छोट्या समस्यांमुळे निराश होतो; परंतु दिव्यांग जन्मापासून अनेक आव्हाने पेलत संघर्ष करतात. त्यांच्या या संघर्षात प्रत्येकाने सहकार्याचा हात पुढे करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. संस्थेच्या प्रकल्पांसाठी शासकीय मदत मिळावी, अशी मागणी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी यावेळी केली.
कार्यक्रमास नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, मानद महासचिव गोपी मयूर, खजिनदार विनोद जाजू, सहखजिनदार जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवर, मंगला कलंत्री, शाहीन शैख, भावेश भाटिया, सतीश पाठारे, नीलम पडतानी, कुणाल भाटिया, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, विशाल आनंद, विनोद जाधव, रत्नाकर गायकवाड, वाल्मीक पाटील उपस्थित होते.
--------
नेत्रदानाचा प्रचार आणि प्रसार तसेच राज्यातील दृष्टीबाधित नागरिकांसाठी संकेतस्थळ तयार करून त्यात सर्व माहिती, विविध योजना, कायदे, नियम यांची माहिती असावी आदी मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती नॅबतर्फे करण्यात आली. दृष्टीबाधित आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण आणि संशोधन वसतिगृहाच्या इमारतीसाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी दिले.
--- फोटो : आर ला : २३ नॅब महाराष्ट्र -------