येवला : तालुक्यातील भारम येथील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ७० विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असून, प्रत्येक वर्गासाठी शिक्षकाच्या नेमणुकीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेलाच टाळे लावले आहे. भारमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येक वर्गासाठी शिक्षकाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने येथील पालकांनी मुलांसह थेट पंचायत समितीमध्ये धाव घेत तेथील शिक्षण विभागातच शाळा भरविली होती. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक पुरविले गेले, परंतु नंतर पुन्हा ‘जैसे थे’च परिस्थिती आहे. त्यामुळे सदरच्या शाळेला कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक होईपर्यंत कुलूप लावण्यात आले आहे. यावेळी कृष्णा जेजूरकर, मुकंूद जोशी, आप्पा देशमुख, ज्ञानेश्वर थोरात, संतोष उपाध्ये, बाळासाहेब देशमुख आदिंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
भारमच्या ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे
By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST