रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा
नाशिक : मे महिन्याच्या पंधरवड्यात वाढलेली रुग्णसंख्या तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांवरील उपचाराची शाश्वती कमी झाली होती. आता परिस्थिती निवळत असून, रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.
जळगावातील रुग्णांना नाशिकमध्ये उपचार
नाशिक : जळगाव, धुळे येथील असंख्य रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी येत आहेत. सध्या कोरोना उपचार घेणाऱ्यांमध्ये शेजारील जिल्ह्यातील रुग्णांची संख्यादेखील बऱ्यापैकी आहे. शहरात कोविड रुग्णालयांची संख्या मोठी असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसते.
शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढली
नाशिक : शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर निर्बंध असले तरी आता काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. निर्बंधामुळे शासकीय कामावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने कर्मचारी कामकाजासाठी कार्यालयात येऊन कामकाज करीत आहेत.
शहरातील बसेस पूर्णपणे ठप्प
नाशिक : अत्यावश्यक कारणांसाठी बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आलेली असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वत:ची वाहने वापरत आहे. कामकाजाच्या वेळेची निश्चितता नसल्याने बसेसच्या भरवश्यावर बसण्यापेक्षा स्वत:च्या वाहनांचा वापर कर्मचारी करू लागले आहेत.
रिक्षाचालकांना चोरीछुपे मिळते पेट्रोल
नाशिक : केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या असल्या तरी रिक्षाचालकांना शहरातील पेट्राेलपंपांवर चोरीछुपे पद्धतीने पेट्रोल दिले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच रस्त्यावर रिक्षा धावत असल्याचेही दिसून येत आहे.