नांदगाव : शेतमाल विक्रीचे पेमेंट चेकद्वारे न करता आरटीजीएस अथवा निफ्टद्वारेच केले जावे, असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाने घेतला असून, सदर पद्धत लागू करण्यासाठी व्यापारीवर्गाने वेळ मागितल्याने नांदगाव मुख्य यार्डवरील मार्चअखेरमुळे बंद असलेले शेतमाल लिलावाचे कामकाज सोमवारपासून (दि.१०) सुरू होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.नोटाबंदीनंतर चलन तुटवड्यामुळे बाजार समितीचे कामकाज बंद होते. परंतु चेकद्वारे पेमेंट सुरू झाल्याने बाजार समितीने लिलावाचे कामकाज सुरू केले. चेकद्वारे पेमेंट होत असताना बॅँकेच्या प्रक्रि येमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चेक जमा होण्यास तब्बल महिना ते दीड महिना लागत आहे. तसेच काही व्यापारीवर्गाचे चेक बाऊन्स होत आहेत. शेतकरीवर्गाला शेतमाल विक्र ीनंतर पेमेंट उशिराने मिळत असल्याने बाजार समितीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी शेतमाल विक्र ीचे पेमेंट चेकद्वारे न करता आरटीजीएस अथवा नेफ्टद्वारेच केले जावे यासाठी संचालक मंडळ व व्यापारीवर्ग यांच्यात ३१ मार्च रोजी बैठक झाली. सदर बैठकीत चेकद्वारे शेतकरीवर्गास पेमेंट मिळण्यास उशीर होत असल्याचे सर्वच शेतकरी प्रतिनिधी संचालकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यापुढे व्यापारीवर्गाने शेतकरीवर्गास केवळ आरटीजीएस अथवा नेफ्टद्वारेच पेमेंट करावे, असा आग्रह संचालक मंडळाने धरला. यावर व्यापारीवर्गात एकमत झाले. यावेळी उपसभापती भाऊसाहेब सदगीर व सर्व संचालक उपस्थित होते.(वार्ताहर)
नांदगाव बाजार समितीत ‘आरटीजीएस’द्वारे पेमेंट
By admin | Updated: April 4, 2017 01:21 IST