दिंडोरी : शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून किसान क्रांती या बॅनर खाली १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्व गावे या संपात उतरणार असून, १ मे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत तसा ठराव होऊन लवकरच शासनाला संपाची नोटीस देण्यात येणार आहे.दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करत संप करण्याची भूमिका घेतली. कवी संदीप जगताप,गंगाधर निखाडे आदींसह अनेक युवा शेतकऱ्यांनी याबाबत पुढाकार घेत गावोगाव बैठका घेउन जनजागृती केली. शनिवारी सायंकाळी लखमापुर फाटा येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनितीधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची याबाबत सहविचार बैठक योगराज लॉन्स येथे संपन्न झाली. यावेळी पुणतांबा येथील धनंजय जाधव जाधव व चिंचखेड येथील कवी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांनी आंदोलनाची भूमिका व दिशा याबाबत माहिती दिली.गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, दुष्काळ, अन यावर्षी शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही तर सरकारला आपली एकजूट दाखवावी लागणार आहे. एक जून पासून सुरु होणाऱ्या संपात शेतकरी शेतीची कामे करणार आहेत पण कोणताही शेतमाल विक्र ीस बाजारात आणणार नाही. असे एकमताने ठरविण्यात आले. दरम्यान याबाबत एक मे च्या ग्रामसभेत ठराव करण्यात येऊन एकत्रित ठराव व संपाची नोटीस देण्यात येणार आहे. किसान क्र ांती चळवळ हि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी पक्ष,जातपात बाजुला ठेऊन सुरु केली आहे. त्यामुळे आपण सर्वजण कृतिशील शेतकरीपुत्र या चळवळीचे आधारस्तंभ आहोत. सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कादवाचे अद्याक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झीरवाळ, माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, हेमलता पाटील, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश बर्डे, बाळासाहेब कदम आदींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत शेतकरी हित लक्षात घेत शेतकरी संप यशस्वी करण्याची भूमिका घेतली. या बैठकीस पक्षीय पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संपात सहभाग
By admin | Updated: May 1, 2017 01:16 IST