बेलगाव कुऱ्हे : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असते. ती पूर्ण करण्यासाठी खडतर मार्गांचा सामना करीत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील एका शेतकरी कुटुंबातील उत्तमराव झनकर व त्यांच्या पत्नी रंजना झनकर हे दांपत्य नऊ वर्षांपासून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पायी दिंडीत विठ्ठल नामाच्या जयघोष करत खडतर पायी वारी पूर्ण करीत मोठा आदर्श निर्माण करीत आहेत.झनकर यांची लहानपणापासूनच पांडुरंगांवर श्रद्धा आहे. रोज न चुकता ते सकाळ- संध्याकाळ गावातील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. याशिवाय घरी संध्याकाळचा हरिपाठ वीस वर्षांपासून नित्यनेमाने अखंडित चालूच आहे.त्र्यंबकेश्वर व पंढरपूरची महिन्याची वारीदेखील ते आजपर्यंत न चुकता करीत आहेत.अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे झनकर हे कुठलीही अपेक्षा न करता अंत:करणापासून विठ्ठलाची भक्ती करत आहेत. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरच्या पायी दिंडीत ते दरवर्षी सहभागी होतात.दुर्दम्य इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर नऊ वर्षांपासून पायी दिंडीत प्रवास पूर्ण करीत ते ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संतवचनाच्या उक्तीनुसार पंढरपूर परिसरात वृक्षलागवडदेखील करत आहेत. जन्मा येणे देवा हाती, करणी जग हसवी या न्यायाने आपला जन्म कोणत्या जातीत, धर्मात, देशात व कोणत्या काळात कसा होईल, हे आपल्या हाती नसते; परंतु कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी वारकरी संप्रदायाचे व्रत अखंड सुरू ठेवले आहे. थोरांचा आदर, गुरूजनांचे ऋण, आई-वडिलांचे पूजन, दर्शन, गायन, पखवाजवादन, भजन, कीर्तन करीत टाळ-मृदंगाच्या गजरात ते पारमार्थिक कार्य करीत आहेत. क्षणाक्षणाला पांडुरंगाच्या भेटीसाठी जगण्याचा आनंद कोणत्याही कार्याला आभाळाची उंची व सागराची खोली मिळवून देऊ शकतो, हेच उत्तमराव झनकर व त्यांच्या पत्नीने जगाला दाखवून दिले आहे.(वार्ताहर)
नऊ वर्षांपासून ‘ते’ करतात पंढरपूरची पायी वारी
By admin | Updated: July 8, 2016 23:17 IST