नाशिक : कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण केली. त्यानंतर पांडे यांनी जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुखांना हटविण्याची तयारी केली, परंतु शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होताच पांडे यांचे बंड थंड झाले आहे. इतकेच नव्हे तर शुक्रवारी झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे त्यांनी आता म्हटले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर विनायक पांडे यांना प्रभाग तेरामधून तर प्रभाग २४ मधून त्यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, तसेच भावजय विद्यमान महिला नगरसेवक कल्पना पांडे अशा तिघांना उमेदवारी पाहिजे होती. पैकी ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडे यांना उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच वादाला सुरुवात झाली. महानगर प्रमुख अजय बोरस्ते तसेच जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अन्य इच्छुकांकडून लाखो रुपये घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप केला. त्यानंतर बोरस्ते आणि करंजकर यांच्यावर पांडे समर्थकांनी हल्ला करून मारहाण केली होती. बोरस्ते समर्थकांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी पांडे यांना तातडीने मुंबईला पाचारण केले होते. त्यानुसार शनिवारी पांडे यांनी ऋतुराज पांडे तसेच समर्थक कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पांडे यांनी बोरस्ते-करंजकर हटावची भूमिका मागे घेतली आणि उलटपक्षी शुक्रवारी झालेले वाद हे गैरसमजुतीतून झाल्याचा दावा केला. आपण स्वत: कोणत्याही प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तसेच आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याने त्यानेही अर्ज दाखल केला नसल्याचे स्पष्ट केले. आता पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगतानाच बंड थंड केल्याचे स्पष्ट केले. यावेळी पांडे यांच्यासमवेत सचिन बांडे, सचिन भालेकर, संतोष कानडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पांडेंचे बंड झाले थंड!
By admin | Updated: February 5, 2017 00:40 IST