नाशिक : अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पालखी आज सकाळी नाशिकरोडहून इंदिरानगर येथे आली. इंदिरानगर, भाभानगर, मुंबईनाका आदि ठिकाणी पालखीचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी (दि.१२) दुपारपर्यंत जुन्या नाशकातील दुर्गा मंगल कार्यालयात पालखी थांबणार आहे.सकाळी १० वाजता नाशिकरोड येथून पादुकांची पालखी इंदिरानगर येथील आदर्श सोसायटीत आशा नागरे यांच्या घरी आली. याप्रसंगी भाविकांनी पालखीची आरती केली. यावेळी सुमारे दोन तास पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखीसोबत महाराजांचे १५० सेवेकरी होते. सजविलेल्या पालखीमध्ये स्वामीजींच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी राजेश नागरे, मंगेश नागरे, गिरीष नागरे आदिंनी सेवेकऱ्यांना न्याहारीचे वाटप केले. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्वामीजींच्या पादुकांची पालखी मुंबईनाका येथील दत्त मंदिराजवळ पोहचली. या ठिकाणी श्री क्षेत्र औदुंबर भक्त मंडळातर्फे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आरती व पूजा करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी दादा महाराज जगताप, नीलेश शिंदे, भूषण काळे, किरण चौधरी, उमेश उगले, सुधीर काळे, महेंद्र काळे आदि उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पालखी
By admin | Updated: May 12, 2015 01:35 IST