नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या मुख्यालयावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून, सीमेपलीकडून हा हल्ला करण्यात आला आहे़ या हल्ल्याची भारताने गंभीर दखल घेतली असून, याचे चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला देण्याची वेळ आल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले भामरे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली़ त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्यदलाच्या उरीमधील मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला असून, हा हल्ला पाकिस्तानपुरस्कृत आहे़ या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा भारताने यापूर्वीही प्रयत्न केला असून, त्याला यशही मिळते आहे़ या हल्ल्याचा पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्याची वेळ आली असून, याबाबत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मी माझी भूमिका मांडणार आहे़ जगातील सर्व संरक्षणमंत्र्यांची सीमेपलीकडील दहशतवाद (क्रॉस बॉर्डर टेररिझम) या विषयावर बैठक झाली़ या बैठकीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका मी मांडली होती़ पाकिस्तानसोबत संबंध असलेल्या देशांनी दहशतवादासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे भामरे यांनी यावेळी सांगितले़ दरम्यान, या आत्मघाती हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री व लष्करप्रमुखांना तत्काळ श्रीनगरला रवाना होण्याचे आदेश दिल्याने भामरे हे नाशिकचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहे़
हल्ल्यामागे पाकिस्तान : भामरे
By admin | Updated: September 19, 2016 00:14 IST