नाशिक : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी दर महिन्याला बॅँकेत फेऱ्या कराव्या लागतात. त्याऐवजी सर्व शासकीय खात्यांनी दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान सेवानिवृत्तिवेतन देण्याची व्यवस्था सुरू झाली असून, पेन्शनर्स संघटनेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या बैठकीत देण्यात आली.असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी असोसिएशनने केलेले विविध प्रयत्न आणि त्याची निष्पत्ती यांची माहिती देण्यात आली. निवड श्रेणीचे आदेश काढण्याकरिता संघटनेने उपोषण केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर विविध बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे वर्षभरात सातशे निवड वेतनश्रेणीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. तसेच कोशागार कार्यालयात पेन्शनर्ससाठी अभ्यागत कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यासाठी कोषागार अधिकारी घोरपडे आणि निर्मल यांचे सहकार्य लाभले. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना १० टक्के निवृत्तिवेतन लागू करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी असोसिएशनचे पुणे शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ मोतीलिंग आणि सरचिटणीस लक्ष्मण टेंबे यांनी मनोगत व्यक्त केले. आर्थिक ताळेबंद आणि अन्य विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)
पाच तारखेलाच मिळू लागले निवृत्तिवेतन
By admin | Updated: October 4, 2015 22:31 IST