नाशिक : आनंदवली-चांदशीकडे जाणाऱ्या गोदाकाठालगतच्या रस्त्याला लागून असलेल्या गवताळ भागात आग लागल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ सातपूर अग्निशामक केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याने वणव्याचा अनर्थ टळला.गोदापार्क परिसरापासून आनंदवली बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उंच टेकडीवर संपूर्ण गवताचे साम्राज्य आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गवत पूर्णत: वाळलेले असून, जवळपास शेकडो मीटरपर्यंतचा परिसर गवताने व्यापलेला आहे. काही टवाळखोरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याभोवती अर्धवट जळालेले सिगारेट फेकल्यामुळे कचऱ्याने पेट घेतल्याचे परिसरातील मजुरांचे म्हणणे आहे. आगीच्या ज्वाला हवेमुळे गवतापर्यंत पोहोचल्याने क्षणार्धात गवत पेटण्यास सुरुवात झाली. या टेकडीवर बाभूळ झाडे मोठ्या संख्येने असून, या झाडांवर कोतवाल, चष्मेवाला, सूर्यपक्षी, बुलबुल, चिमण्या यांसारख्या लहान पक्ष्यांचा अधिवास आहे. पेटलेल्या गवतामुळे आगीच्या ज्वाला आणि उठणारे धुराचे लोट यामुळे घरट्यांमध्ये असलेले पक्षी सैरभैर झाले आणि सुरक्षित निवासाचा शोध घेऊ लागले; मात्र धुराचे प्रचंड प्रमाण असल्याने त्यांचाही जीव गुदमरत होता. आगीचे प्रमाण वाढत होते कारण नदीचा परिसर आणि मोकळ्या मैदानामुळे वाऱ्याचा वेग अधिक होता. वाळलेले गवत वेगाने पेटत होते.