सटाणा : राज्य मार्ग क्रमांक १९च्या सटाणा - शेमळी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली वृक्षतोडी- संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, मंगळवारी मालेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी. झांबरे यांनी कामाची पाहणी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपअभियंता पी.एम. राजपूत यांना दिले.२०१४-१५च्या अर्थसंकल्पात सटाणा ते शेमळी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. गेल्या अडीच महिन्यापासून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या रुंदीकरणाच्या नावाखाली बांधकाम विभागाने दहा झाडांच्या परवानगीवर सव्वीस झाडांची कत्तल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. यावर लोकमतने वन विभागाचा हवाला घेऊन प्रकाशझोत टाकला होता. या वृत्तामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, या प्रकाराबाबत मालेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी. झांबरे यांनी काल सटाणा-शेमळी रस्त्याची पाहणी केली. यावेळी उपअभियंता पी.एम. राजपूत, संबंधित शाखा अभियंता यांची चांगलीच खरडपट्टी काढली. वृक्षतोडीबाबत दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याबरोबरच नव्याने वृक्ष लागवड करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता झांबरे यांनी दिले. दरम्यान सटाणा-मालेगाव रस्त्यासाठी केंद्राच्या राखीव निधीमधून सोळा कोटी रुपये मंजूर झाल्याची माहितीही झांबरे यांनी दिली. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, शेमळी ते लखमापूर हा रस्ता दहा मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होईल, असेही झांबरे यांनी सांगितले.(वार्ताहर)
वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 22:44 IST