त्र्यंबकेश्वर : मार्चअखेर कामे पूर्ण होतील, असे छातीठोक सांगणारी जिल्हा प्रशासन यंत्रणेने आता ३० एप्रिलपर्यंत कामे पूर्ण करण्याचा नवीन आदेश स्थानिक यंत्रणाद्वारे सर्व ठेकेदार व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शनिवारी (दि. १८) नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी सिंहस्थ कामांना भेटी दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना कामे पूर्ण करून घेण्याबाबत व ठेकेदारांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. भेटीत गोदावरी घाट (स्मशानभूमीजवळ) तेथून अहल्या नदीवरील घाटाची पाहणी केली. या ठिकाणी या दोन्ही अधिकाऱ्यांनी मौलिक सूचना केल्या. घाटांना कलर देण्याबाबत सुचविले, काही ठिकाणचे टॉयलेट ब्ब्लॉकची देखील पाहणी केली. पत्रे कोणते आणायचे हेही सांगितले. त्यानंतर कुशावर्त तीर्थाची पाहणी करून पुण्याच्या हरित लवादाच्या सूचनेनुसार त्र्यंबक येथे रिव्हर सेव्हरचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्यात सांडपाणी दुसऱ्या लाइनमध्ये, तर गोदावरी अलग वाहणार आहे. त्यानुसार गोदावरी पात्राच्या दुतर्फा रिव्हर सेव्हर बसायचे आदेश दिले. तथापि, येथील परिस्थिती पाहता रिव्हर सेव्हरची लाइन एकाच बाजूला करावी लागेल. सत्यनारायण मंदिराच्या डावीकडे रस्ता अरुंद असल्याने त्या बाजूला रिव्हर सेव्हरची लाइन टाकणे अशक्य असल्याचे संबंधितांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.अधिकाऱ्यांचा दौरा जवळपास रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होता. सर्व कामांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कामात कसूर होता कामा नये असेही यावेळी त्यांनी सांगितले. एवढे मात्र खरे की, ठेकेदारांनी अक्षरश: धसका घेतल्याने कामात कुचराई करून चालणार नाही. साधुग्राम रक्षक नगरचीही जाता जाता पाहणी केली. साधुग्राम व रक्षकनगर शहरापासून २/३ कि.मी. अंतरावर आहे. तसे ते लांबच झाले आहे. मागील कुंभमेळ्यात ही दोन्ही ठिकाणी रेस्ट हाऊसजवळ होती. या दोैऱ्यात त्यांच्यासमवेत मेळा अधिकारी महेश पाटील, निर्मळ, एन.एम. नागरे, पालिका अभियंता प्रशांत जुन्नरे, रमेश कांगणे, आर्कि., इंजिनिअर प्रवीण पगार, बीडीओ. प्रमिला जायलेकर आदि अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
कामाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By admin | Updated: April 20, 2015 23:54 IST