नाशिक : महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यासंदर्भात हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे समितीची बैठक बोलावण्यास महापौरांनी नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी पाच जणांनी स्पष्ट विरोध केला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत चौदा सदस्य आहेत. त्यापैकी आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समिती सभापती वगळता नगरसेवक असलेले सदस्यच कामकाज करीत आहेत. पर्यावरण क्षेत्रात कामाचा दहा वर्षांचा अनुभव नसल्याच्या कारणावरून अन्य अशासकीय सदस्यांना बैठकीस बोलावले जात नाही. त्यातच अस्तित्वात असलेल्या अर्धवट समितीकडून बेसुमार वृक्षतोडीचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे शहरातील काही पर्यावरणप्रेमींनी हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे आणि वृक्षतोडीस मनाई करतानाच वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यातच येत्या १७ किंवा १९ तारखेला आयुक्तांच्या अधिपत्याखालील समितीची बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीचे महापौरनियुक्त सदस्य संदीप भंवर, मनोज घोडके, नंदू वराडे, शिवाजी पालकर, राजेश पंडित यांनी आयुक्तांना पत्र पाठवून कोणत्याही प्रकारे बैठक बोलावू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीस विरोध
By admin | Updated: May 12, 2014 23:17 IST