नाशिक : मुंबई ते नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेस इगतपुरी तालुक्यातील चारही गावांच्या जागामालकांनी तीव्र हरकत घेत विरोध दर्शविला आहे. एक इंचही जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका जागामालकांनी घेतल्यामुळे प्रशासन पेचात पडले असून, शेतकऱ्यांच्या विरोधाबाबतची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. समृद्धी एक्स्प्रेस हायवेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधील जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या विरोधामुळे फसल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून ती पूर्ण करण्यास सुरुवात करण्यात आली, परंतु मोजणीदेखील करू देणार नाही इतका तीव्र विरोध जमीनमालकांनी केल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट जमीनमालक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला व या मार्गापासून होणारे फायदे समजावून सांगण्यास सुरुवात केली, परंतु त्यालाही पाहिजे त्या प्रमाणात यश मिळू शकले नाही. त्यामुळे अखेर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जागामालकांकडून क्षेत्र संपादित करण्याची अधिसूचना काढली. त्यात एक्स्प्रेस-वेसाठी लागणाऱ्या गटाची माहिती व त्यातील हवी असलेली जागा यासाठी जागामालकांनी संमती द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी ४५ दिवसांची मुदतही देण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा, शेणीत, भरवीर खुर्द, कवडदरा या चार गावांसाठी डिसेंबर महिन्यात काढण्यात आलेल्या या अधिसूचनेस संपूर्ण गावानेच विरोध दर्शविला आहे. जवळपास चार गावे मिळून ९९ हरकती दाखल झाल्या असून, त्यात पिंपळगाव डुकरा येथे ४७, शेणीत ४, भरवीर खुर्द ४८ इतकी संख्या आहे. त्यामुळे एक इंचही जमीन शेतकरी देण्यास तयार नसल्याने नेमके काय करावे याचे मार्गदर्शन शासनाकडे मागविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘समृद्धी’च्या अधिसूचनेस गावांचा विरोध
By admin | Updated: January 21, 2017 00:03 IST