नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शनिवारी (दि.२३) दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार नाशिक शहरातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १ ऑगस्टपासून संकेतस्थळावर प्रवेश देण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. तर २ ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालकांना नोंदणी करणाऱ्या संस्थांची माहिती ऑनलाइन पडताळणी करून प्रमाणित करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९ ऑगस्टपासून विद्यार्थी स्वत: पालकांच्या, शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रांच्या मदतीने ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा लागणार आहे. या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या आधारे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरल्यानंतर शुल्क भरून फॉर्म लॉक करता येणार आहे. त्यानंतर अर्जातील माहिती प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा अथवा मार्गदर्शन निवडण्यासोबतच आपल्या अर्जाची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ही माहिती संबंधित शाळा व मार्गदर्शन केंद्रांना तपासून प्रमाणित करता येणार, अर्जाची पडताळणी झाली अथवा नाही, याची विद्यार्थ्यांना खात्री करून घ्यावी लागणार आहे.
इन्फो
गतवर्षी नाशकातील स्थिती
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
एकूण जागा - २५२७०
प्रवेशासाठी नोंदणी - ३२,१३३
प्रवेशित विद्यार्थी - १९,७१२
रिक्त राहिलेल्या जागा - ५,५५८
विज्ञान शाखेच्या होत्या सर्वाधिक जागा
शिक्षण विभागाने मागील वर्षी शहरात राबविलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जवळपास ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १० हजार १६० जागांचा समावेश आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या ८ हजार ६०० जागा आहेत, तर कला शाखेच्या ४ हजार ९१० व एमसीव्हीसीच्या १३६० जागांचा समावेश आहे.