.उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू सप्ताहात उन्हाळ (गावठी) कांद्याची ५८ ते ६० हजार क्विंटल इतकी प्रचंड आवक झाली. पूर्ण सप्ताहात सर्व्वोच्च भाव १५०० ते १७०० रुपये, तर सरासरी भाव १२५० रुपये एवढा होता. चालुवर्षी गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याचे बाजारभाव तेजीत राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. गारपिटीतून वाचलेला कांद्याची चाळीत साठवणूक केली; परंतु दोन महिन्यांपूर्वी एकदाच कांद्याचे भाव २५०० रुपयांपर्यंत पोहोचले असता भाव अजूनही वाढतील या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी कांदा साठवण केली; परंतु किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होऊ लागल्याने ग्राहकांनी ओरड सुरू केली. परिणामी केंद्र शासनाने भाववाढीवर हस्तक्षेप करून निर्यात-शुल्कात वाढ करून तसेच जीवनावश्यक वस्तूत कांद्याचा समावेश केल्याने कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली ती आजपर्यंत सुरूच आहे. चालू सप्ताहात कमीत कमी ५०१ ते जास्तीत जास्त १७०१ रुपये तर १२५० रुपये सरासरी दराने कांदा विक्री होत आहे. दररोज ९०० ते हजार वाहनांतून ११ ते १२ हजार क्विंटल आवक होत आहे. (वार्ताहर)