एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले असले तरी स्वबळाची भाषा करणाऱ्या अनेक
पक्षांची एकसदस्यीय प्रभागरचनेमुळे अडचण झाली आहे. म्हणायला सारेच
कशीही प्रभागरचना लढणारच म्हणणाऱ्या बहुतांश सत्तारूढ पक्षांनी मात्र एकसदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यानंतर आता द्विसदस्यीय प्रभागरचनेची मागणी
केली असून, शिवसेना तर शुक्रवारी (दि.३) मुंबईत धडकणार असून, द्विसदस्यीय
निवडणूक जाहीर करण्याची मागणी करणार आहे. काँग्रेसनेही संपर्कमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी
महिन्यात होणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या वेळी एका प्रभागातून
चार नगरसेवक निवडून देण्यामुळे राजकीय पक्षांमध्ये उत्साह नव्हता.
त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला त्याचा लाभ झाला आणि १२२ पैकी
६६ जागा या पक्षाला मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला ३५ जागा मिळाल्या
हेात्या. अन्य पक्षांचे पानिपत झाले होते. भाजपने एका प्रभागातून चार
सदस्य निवडण्याची केलेली खेळी शिवसेनेसह अन्य पक्षांना जड गेल्याने
राज्यात सत्तांतर झाल्यानंरतर हा निर्णय फिरवण्यात आणि एका प्रभागातून एक
सदस्य म्हणजे नगरसेवक निवडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर
निवडणुकीच्या तोंडावर त्यात बदल होईल, असे सांगण्यात आले होते.
काेरोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या.
त्यावेळी काँग्रेस पक्षाने ‘एक प्रभाग, एक सदस्य’ तर राष्ट्रवादी आणि
शिवसेनेने दाेन सदस्यांची मागणी केली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या
लाटेनंतर त्यासंदर्भात निर्णय काहीच झाला नाही. त्यामुळे राज्याच्या
निवडणूक आयोगानेदेखील आता एकसदस्यीय प्रभागाची रचना करण्याचे निर्देश
दिले आहेत. त्यानुसर आता कामकाजदेखील सुरू झाले असले तरी स्वबळाची भाषा
करणाऱ्या बहुतांश पक्षांना आता मैदानात लढण्यासाठी साेपे राहिलेले नाही.
त्यामुळे आता वेगवेगळी कारणे सांगून राजकीय दोन किंवा तीनसदस्यीय
प्रभागांची मागणी करीत आहेत. शिवसेनेचे शिष्टमंडळ शुक्रवारी (दि.३)
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुधाकर
बडगुजर यांनी दिली, तर काँग्रेस पक्षानेदेखील संपर्कमंत्री बाळासाहेब
थोरात यांना भावना कळवल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी
सांगितले.
इन्फो...
महिलांना न्याय मिळावा म्हणून
द्विसदस्यीय प्रभागरचनेत एक महिला आणि एक पुरुष, अशा दोन उमेदवारांना
संधी दिली जाऊ शकेल, असे समर्थन आता केले जात आहे. एखाद्या कार्यकर्त्याला
जातीय समीकरण किंवा पक्षातील सक्षम उमेदवाराची अडचण झाली, तर अशावेळी
घरातील महिला उमेदवार म्हणून तो देऊ शकतो, असे शिवसेनेेचे गटनेते विलास
शिंदे यांनी सांगितले.
कोट....
कसेही लढण्यास भाजप तयार
अपक्षांची सद्दी संपावी आणि राजकीय ब्लॅकमेल टाळावे यासाठी भाजपाने
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबली होती. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत,
त्यामुळे महाविकास आघाडीने कोणताही निर्णय घेतला तरी आमची लढण्याची तयारी
आहे.
-गिरीश पालवे, शहराध्यक्ष भाजप