नाशिक : कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा सुरू होऊ शकल्या नसल्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. यंदा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण सुरू होऊनही नवीन पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आलेली नाहीत, अशा वेळी जिल्हा परिषदेने आपल्याच विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी वाटप केलेले सुमारे एक लाख पुस्तकांचे संच पुन्हा जमा केले आहेत. या पाठ्यपुस्तकांचे पुन्हा वितरण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वापरात आणले आहेत.
जमा करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक संचात इंग्रजी व उर्दू माध्यमांचाही समावेश असून, जिल्हा परिषदेने पुस्तके छपाईच्या निमित्ताने होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यास हातभार तर लावलाच; परंतु पाठ्यपुस्तकांचा जपून वापर करण्याची नवीन सवय विद्यार्थ्यांना लावली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद करण्यात आल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेपूर प्रयत्न केले. विविध माध्यमांचा वापर करून शिक्षक व विद्यार्थ्यांचा संपर्क कायम राहिला व त्याआधारे वर्षभर विद्यादानाचे कार्यही सुरू राहिले. वर्षभर हा उपक्रम सुरूच राहिला. त्यातून विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्यात आली. मात्र, वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत. यंदाही काहीशी तशीच परिस्थिती असून, जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची सोय आहे, अशा ठिकाणी नियमित अभ्यासक्रम सुरू झाला असून, सोय नसलेल्या ठिकाणी मात्र कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. एरव्ही शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनाकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी व पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा, हा यामागचा हेतू असला तरी यंदा मात्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून घेतली; परंतु पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केलेला नाही. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेली पाठ्यपुस्तके जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके जमा केली. त्यातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी त्याला हातभार लावला व तितक्या पाठ्यपुस्तकांचा संच जमा करण्यात आला आहे.
चौकट====
विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे
आपल्याकडील पाठ्यपुस्तके पुन्हा शाळेकडे जमा करून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी लागणारा कागद व त्यासाठी झाडांची होणारी हानी, यामुळे टळण्यास मोठा हातभार लागला आहे. पर्यावरणाची जपणूक करतानाच विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वापरण्याची सवय लागली आहे.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
--------
इयत्तानिहाय जमा झालेली पुस्तके
इयत्ता पहिली- १०,९८२
इयत्ता दुसरी- १२,६९८
इयत्ता तिसरी- १४,१२१
इयत्ता चौथी- १४,४३९
इयत्ता पाचवी- ११,२११
इयत्ता सहावी- १२,२१३
इयत्ता सातवी- १२,१२५
इयत्ता आठवी- ११,१७१