नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रोडच्या शेतातील पडक्या घरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठस जप्त केला आहे़ नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी (दि़२१) मतदान होते आहे़ या निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना पैसे तसेच मद्याचे आमिष दाखविण्याच्या शक्यतेने राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे़ त्यानुसार जोपूळ रोडवरील एका शेतातील पडक्या घरात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पहाटेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने या घरावर छापा टाकला़ या पडित घरामध्ये १८० मिली देशी दारूचे ११ खोके, १८० मिलीचे मॅकडॉवेल व्हिस्कीचे ११ खोके असा १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला़ या घराच्या मालकाचा पोलीस शोध सुरू आहे़ ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आय. वाघ, दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कराळे यांच्यासह, म़ गरुड, संतोष कडलग, मुस्तफा तडवी, सोन्याबापू माने, जाधव, मोठ्याभाऊ पवार यांच्या संयुक्त पथकाने केली. (प्रतिनिधी)
एक लाखाचा मद्यसाठा जप्त
By admin | Updated: February 21, 2017 01:41 IST