सिन्नर : तालुक्यातल्या डुबेरे शिवारात अज्ञात चार ते पाच जणांनी एकावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्याच्या ताब्यातील किरकोळ रक्कम व मोबाइल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास डुबेरे येथील बाळासाहेब रूपवते गावातून मळ्यातील आपल्या वस्तीवर जात असताना डुबेरे शिवारातील धुप्याच्या बंधाऱ्यावर अज्ञात चार ते पाच जण त्यांना आडवे झाले. त्यांनी रूपवते यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचे समजते. रूपवते यांनी त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला. रूपवते चोरट्यांना प्रतिकार करू लागल्यानंतर त्यांनी चाकूसारख्या धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. रूपवते यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर शस्त्राने वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेले रूपवते मृत्यूमुखी पडल्याचा समज झाला. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे तीनशे रुपये व मोबाइल घेऊन पोबारा केला. रूपवते यांना काहीवेळाने शुद्ध आल्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेऊन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी रूपवते यांचा जबाब घेतला असून, सदर प्रकार चोरीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
डुबेरे शिवारात चोरट्यांच्या हल्ल्यात एक जखमी
By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST