नाशिक - महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून प्रयत्न केले जातात. त्यात कर संकलन विभागाचा मोठा वाटा आहे. यंदा या विभागाने कर वसुलीसाठी जोर लावला असून आयुक्तांनी दिलेल्या २१० कोटींच्या उद्दिष्टापैकी फेब्रुवारीपर्यंत १७३ कोटी वसूल झाले आहेत. मार्च अखेरपर्यंत म्हणजे पुढील ३५ दिवसात उर्वरित उद्दिष्ट गाठावे लागणार असून दिवसाला एक कोटीची वसुली करावी लागेल. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुली २० कोटींनी सरप्लस आहे.
महापलिकेच्या उत्पन्नात नगररचना विभागानंतर सर्वाधिक वाटा हा करसंकलन विभागाचा आहे. गतवेळी या विभागाने १८८ कोटींचा कर गोळा करत रेकाॅर्डब्रेक वसुली केली होती. शेवटच्या टप्प्यात घाम गाळत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात लक्ष साध्य केले होते. आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षासाठी करसंकलन विभागाला २१० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या नेतृत्वात करसंकलन विभागाने पहिल्या तीन महिन्यात सत्तर कोटीपर्यंत बंपर वसुली केली. त्यानंतही वसुलीचा आलेख चढता आहे.
आजमितीला २१० पैकी १७३ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. गतवेळी हेच प्रमाण १५३ कोटी इतके होते. गतवेळेच्या तुलनेत यंदा सरप्लस असलो तरी मार्च अखेरपर्यंत ३७ कोटी वसूल करावे लागणार आहे. म्हणजे दिवसाला एक कोटी वसूल करावे लागतील. मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या कामाची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात करसंकलन विभागात नाशिकरोड, सातपूर, सिडको, पश्चिम, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या विभागातील काम अवघ्या ७० कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. या सर्व अडचणीवर मात करून करसंकलन विभागाला दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.
विभागनिहाय करवसुलीसातपूर १८ कोटी ५९ लाख
ना. पश्चिम २८ कोटी ५६ लाखनाशिक पूर्व २९ कोटी १५ लाख
पंचवटी ३२ कोटी ३३ लाखसिडको ३७ कोटी ५६लाख
नाशिकरोड २७ कोटी ४५ लाख