सिन्नर/ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे देवनदी, म्हाळुंगी व शिवनदीला पूर आला होता. मंगळवारी तालुक्यातील पास्ते व ठाणगाव येथे पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील पास्ते येथील एकाचा मृतदेह सापडला असून, ठाणगाव येथून वाहून गेलेला युवक अद्याप बेपत्ता आहे.पास्ते येथे मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सहादू अर्जुन माळी (६३) हे बसमधून उतरले. शिवनदीला पूर असल्याने वडिलांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा सुकदेव (३२) हा पास्ते गावात आला होता. सुकदेव हा वडिलांना घेऊन शिवनदी पार करीत असताना या पाण्यात बाप-लेक वाहून गेले.सुदैवाने त्यात सहादू माळी वाचले. मात्र सुकदेव माळी (३२) हा युवक वाहून गेला. घटनास्थळी सिन्नर पोलीस व मदतकार्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र पुरापुढे कोणाचे काही चालत नव्हते. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही सुकदेव मिळून आला नाही. बुधवारी सकाळी शिवाजवळ सुकदेवचा मृतदेह मिळून आला. (वार्ताहर)
पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला
By admin | Updated: August 5, 2016 00:25 IST