ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, उद्योजक विशेषत: महिलांचे व्हॉटसअॅप अकाऊंट हॅक करून त्याद्वारे अश्लिल संदेश पाठवणारा हॅकर दिप्तेशकुमार सालेचा याला नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांच्या पथकाने रविवारी (2 जुलै) रात्री राजस्थानमधून अटक केली.
सायबर पोलिसांकडे सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केल्याच्या 31 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये २९ महिला तर दोन पुरुषांचा समावेश होता. २९ हॅकर्सने या महिलांच्या अकाउंटवरून अश्लिल मॅसेजेस पाठवल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
बहुतांशी नागरिकांकडून अॅन्ड्राईड मोबाइलचा वापर केला असून सोशल मीडियाद्वारे कनेक्टीव्हिटीत वाढ झाली आहे. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या या सोशल मीडियाच्या दुष्परिणामांना शहरातील या प्रतिष्ठित महिलांना सामोरे जावे लागले. अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी आपले कौशल्य पणास लावून या हॅकरचा आय.पी. अॅड्रेस व पत्ता शोधून काढला.
यात हॅकरचे ठिकाण गुजरात व राजस्थानात दाखवण्यात आले. शहरवासीयांचे त्यातही बहुसंख्य महिलांचे केवळ व्हॉट्सअॅप अकाउंटच नव्हे तर फेसबुक व इन्स्टाग्रामचे अकाउंटही हॅक करण्यात आल्याच्या तक्रारी पोलीसांकडे नोंदवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, दिप्तेशकुमार हा हॅकिंगमध्ये सराईत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सतत आपले ठिकाण बदलत होता. या हॅकरच्या मागावर शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली होती. त्यांनी राजस्थानमधून दिप्तेशकुमारला अटक केली.