चांदवड : येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकास महितीच्या अधिकाराची माहिती देऊनही हे प्रकरण मिटविण्यासाठी २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली व त्यातील पाच हजार रुपये खंडणीपोटी घेत असताना पोलिसांनी रंगेहाथ एकास पकडले. याबाबत चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील जिल्हा परिषद उर्दूू शाळेचे मुख्याध्यापक मन्सुर महेबूब खान यांना शेख रियाझ अहमद अब्दुल वाहीद रा. नागड दरवाजारोड, येवला यांनी दि. ११ आॅगस्ट १५ रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती देणेबाबत अर्ज केला. संबंधित मुख्याध्यापकांनी ती माहिती दिलीदेखील त्यावर शेख यांनी वरिष्ठांकडे अपील केले. याबाबत सदर प्रकरण मिटवण्यासाठी आपण मला २० हजार रुपये द्यावे त्यापैकी तीन हजार रुपये मुख्याध्यापक मन्सुर खान यांनी दिले होते. त्यापैकी पाच हजार रुपयाची रक्कम गुरुवारी (दि. १९) देण्याचे ठरले. त्यानुसार मुख्याध्यापक मन्सुर खान यांनी चांदवड पोलीस स्टेशनला घटनेचा अर्ज दिला. त्यानुसार चांदवडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, श्रीकांत अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांदवड बसस्थानका-समोरील संगम हॉटेल येथे सापळा रचून शेख रियाझ अहमद अब्दुल वाहीद येवला यास ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
चांदवडला खंडणी प्रकरणी एकास अटक
By admin | Updated: November 19, 2015 23:31 IST