पंचवटी : ओम नम: शिवाय... हर हर महादेव... असा जयघोष करीत शेकडो भक्तांनी पहिल्या श्रावण सोमवारनिमित्ताने श्री महादेव कपालेश्वराचे दर्शन घेतले.श्रावण सोमवार निमित्ताने सकाळी कपालेश्वर मंदिरातील ब्रह्मवृंदांच्या हस्ते पूजन व अभिषेक करण्यात आला. श्रावण मासातील सोमवारला विशेष महत्त्व असल्याने भाविकांनी भल्या पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दक्षिण दरवाजाने आत, तर उत्तर दरवाजाने बाहेर सोडण्यात येत होते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मुख्य पूर्व दरवाजाने प्रवेश बंद करण्यात आलेला होता.दर्शनासाठी येणारे भाविक ओम नम: शिवाय, हर हर महादेव असा जयघोष करीत असल्याने संपूर्ण मंदीर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धार्मिक संस्था तसेच मंडळांच्या वतीने प्रसादाचे वाटप केले जात होते. श्रावण मासानिमित्ताने पंचवटी परिसरातील कैलास मठ, श्री नारोशंकर मंदिर आदिंसह अन्य शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविकांची मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर लोखंडी तटबंदी करून वाहतूक बंद करण्यात येऊन पायी जाणाऱ्या भाविकांना सोडण्यात येत होते. परिसरात शांतता कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला फेऱ्या मारण्यास बंदी करण्यात आलेली होती. (वार्ताहर)
ओम नम: शिवायचा गजर
By admin | Updated: August 18, 2015 00:16 IST