शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘ओखी’ने केले हवालदिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:52 IST

किरण अग्रवाल ढगाळ हवामानामुळे अगोदरच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळालेले असताना त्यात ‘ओखी’ने दणका दिला. द्राक्ष, कांदा, मका, भात, भाजीपाला अशी सर्वांनाच त्याची झळ बसली. निसर्गाच्या मारापुढे हतबल व्हावे अशीच ही सारी परिस्थिती आहे. पण, गेल्या आॅक्टोबर महिन्यातील अवकाळीच्या नुकसानीचाच छदाम अद्याप मिळालेला नसताना या ‘ओखी’च्या पंचनाम्यांतून काय व कधी हाती लागणार, हा प्रश्नच आहे. चहूबाजूने घेरले जावे असे हवालदिल करणारेच हे चित्र आहे; पण शासनकर्त्यांत तशी संवेदना आहे कुठे?

ठळक मुद्दे‘ओखी’ने केले हवालदिल!‘ओखी’च्या पंचनाम्यांतून काय व कधी हाती लागणार

किरण अग्रवाल

ढगाळ हवामानामुळे अगोदरच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळालेले असताना त्यात ‘ओखी’ने दणका दिला. द्राक्ष, कांदा, मका, भात, भाजीपाला अशी सर्वांनाच त्याची झळ बसली. निसर्गाच्या मारापुढे हतबल व्हावे अशीच ही सारी परिस्थिती आहे. पण, गेल्या आॅक्टोबर महिन्यातील अवकाळीच्या नुकसानीचाच छदाम अद्याप मिळालेला नसताना या ‘ओखी’च्या पंचनाम्यांतून काय व कधी हाती लागणार, हा प्रश्नच आहे. चहूबाजूने घेरले जावे असे हवालदिल करणारेच हे चित्र आहे; पण शासनकर्त्यांत तशी संवेदना आहे कुठे?

आजवर सुल्तानी संकटांची नेहमी चर्चा होत आली आहे, आरोप झाले आहेत; पण आता अस्मानी संकटे इतकी ओढवली जाऊ लागली आहेत की, त्यापुढे सारेच फिके पडावे. एका दृष्टचक्रातून कसेबसे बाहेर पडत नाही की दुसरे काही न काही वाढून ठेवलेले असतेच, अशी निसर्गाची स्थिती झाली आहे. अर्थात, ती स्थिती बदलणे आपल्या हातचे नाही हेही खरे; परंतु अशा स्थितीच्या सूचना पुरेशा वेळेआधी मिळू शकल्या तर होणारे नुकसान काहीसे टाळता येऊ शकते. आणि या उपरही जे टाळता आलेले नसते, ते भरून काढण्याच्या दृष्टीने दिलाशाचा, मदतीचा हात वेळच्या वेळी पुढे आला तर त्याला अर्थ असतो. गडबड होते ती या पातळीवर, त्यामुळेच अस्मानीपाठोपाठच्या ‘सुल्तानी’ संकटावर टीकेची झोड उठणे स्वाभाविक ठरून जाते.गेल्या दीड महिन्यापूर्वी म्हणजे आॅक्टोबरमध्ये बसून गेलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यातून अजून पुरेसे सावरलेले नसतानाच ‘ओखी’च्या पावसाने बळीराजाला दणका देऊन ठेवला आहे. आॅक्टोबरमधील नुकसानीचे पंचनामेही मुळात उशिरा सुरू झाले होते. सुमारे विसेक हजार शेतकºयांना त्यावेळी नुकसानीस सामोरे जावे लागले होते. ती भरपाई अद्याप हाती पडलेलीच नाही. अशात कसेबसे सावरत शेतकºयांनी पुढची तयारी केली तर त्यात हे ‘ओखी’ चक्रीवादळ उपटले. ते येण्यापूर्वी तसेही गेल्या आठवड्यातील हवामान अतिशय खराब राहिले. सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा तीनवेळी तीन ऋतूंचा अनुभव यावा असे हवामान होते. हे वातावरण मनुष्यजीवाच्या आरोग्यासाठी जसे घातक असते तसे शेती उत्पादनाच्या दृष्टीनेही प्रतिकूल असते. त्यामुळे विशेषत: द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली होती. थंडीचे वाढलेले प्रमाण व त्यात ढगाळ हवामान यामुळे द्राक्षातील साखरेवर परिणाम होत होता. अशात भुरी व मिलीबगसारख्या रोगांनाही निमंत्रण मिळून जात असल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या होत्या. ‘ओखी’च्या पावसाने थेट द्राक्ष मण्यांवरच घाला घातला. अनेकांच्या शेतातील द्राक्षमणी गळून पडले तर काहींना तडे गेले. द्राक्षबागांची खुडणी आली असताना हे संकट ओढवले. २०१०च्या डिसेंबरमध्येच फियाननामक वादळाचे संकट ओढवले होते. त्यावेळीही असेच अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्याचीच आठवण या ‘ओखी’मुळे ताजी झाली असे म्हणता यावे.द्राक्षाप्रमाणेच कांदा, मका, सोयाबीन या पिकांचेही नुकसान ‘ओखी’ने केले असून, इगतपुरी-सुरगाणा या आदिवासीबहुल व अतिपर्जन्याच्या परिसरातील भात व धानासह नागली, खुरसणी, वरईचेही नुकसान झाले आहे. भात, वरई पिके खळ्यात मळणीकरिता येऊन पडलेली असताना पाऊस झाल्याने ती मातीमोल झाली. कांद्याचेही तेच झाले आहे. लाल कांदा खळ्यात येऊन पडलेला आहे. ठिकठिकाणी कांद्याच्या काढणीला वेग आल्याचे चित्र असले तरी कांदा चाळींची अपूर्णता जाणवत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणातील कांदा अद्याप खळ्यावर पडून होता. गेल्या दोनेक महिन्यात कांदा दराची स्थिती काहीशी समाधानकारक होती. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. कांदा बाजारात नेण्याच्या दृष्टीने त्यांची लगबग सुरू होती. अशात कांद्याचे किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले गेल्याने निर्यातीला आळा बसला. परिणामी स्थानिक बाजारपेठेत कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरले. ‘ओखी’च्या पावसात हा कांदाही भिजल्याने आणखीनच पंचाईत झाली. मक्याचे तसेच झाले. अगोदरच यंदा मक्याची हालत खराब होती. गेल्या वर्षीचाच मका शासकीय गुदामांमध्ये पडून असल्याने आरडाओरड झाली. विशेष म्हणजे, सुमारे तेराशे रुपये प्रतिक्विंटल हमी दराने घेतला गेलेला ३८ हजार क्विंटल मका मुळात ठेवायला जागा नव्हती म्हणून तो खासगी गुदामांत ठेवला गेला. तेथे त्याचे पीठ होऊ लागले म्हणून अखेर स्वस्त धान्याच्या रेशन दुकानांवर तो तीस पैसे किलोने विकण्याची वेळ शासनावर आली आहे. यात गुदामे उपलब्ध नसल्याने नवीन मका खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाºयाकडे न्यावा तर भाव मिळत नाही व खळ्यात ठेवले तर ‘ओखी’ने भिजवले, अशी मका उत्पादकांची ससेहोलपट झाली. ‘ओखी’मुळेच मुंबईत भाजीपाला जाऊ शकला नाही. तो स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात आल्याने नाशकात कोथिंबीर, मेथी फेकून देण्याची वेळ आली. ‘ओखी’चा तडाखा असा सर्व शेती उत्पादकांना बसल्याचे दिसून आले आहे.निसर्गापुढे हात टेकावेत, अशी ही एकूण स्थिती आहे. तिथे कुणाचे काही चाले ना, हेच खरे. परंतु किमान जे आपल्या हाती आहे, ते अचुकपणे व प्रभावीपणे केले गेले तरी यातील काही नुकसान टाळता येणारे आहे. जसे ‘ओखी’चा वेळेपूर्वीच इशारा हवामान खात्याकडून मिळाला असता तर काही उपायात्मक योजना बळीराजाला करता आल्या असत्या; पण ऐनवेळीच सारे प्रसृत केले गेले, त्यामुळे आवरा-सावरला फारशी संधी मिळाली नाही. दुसरे म्हणजे, कांदाचाळींची मागणी व त्या तुलनेत मंजुरी व अनुदान यांचे प्रमाण यात कमालीची तफावत आढळून येते. कांदा चाळींसाठीची पूर्व संमतीची अट रद्द अथवा शिथिल करावी अशी मागणी आहे; पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. म्हणजे एक तर शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकरी कांदाचाळ बांधू शकत नाही व बांधली तरी किरकोळ कारणांवरून त्याचे अनुदान नाकारले जाते, त्यामुळे खळ्यावर कांदा भिजू देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहात नाही. यासाठी मागेल त्याला कांदाचाळ अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी शेतकºयांकडून केली जाते आहे. तिसरे म्हणजे, ‘ओखी’ अगर बेमोसमीसारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर तातडीने शेतातील नुकसानीचे पंचनामे केले जाऊन मदतीचा हात पुढे यायला हवा. पण तेही होत नाही. म्हणजे पुन्हा जाचक निकषांमुळे पीकविम्याचा लाभ होण्याची मारामार असताना शासकीय दिलासा पुरेशा प्रमाणात मिळताना दिसत नाही. गेल्या आॅक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज खुद्द महसुली यंत्रणेने नोंदविला आहे. शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाने यासंदर्भातील पंचनामे व अहवाल केले आहेत. त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या भरपाईची गरज असल्याचेही म्हटले आहे. पण जिल्हाधिकाºयांमार्फत ही मागणी ‘वर’ मंत्रालयात पोहोचेल कधी, त्यावर निर्णय होऊन प्रत्यक्षात नुकसानग्रस्त बळीराजाच्या हाती काय व केव्हा पडेल, याची काही शाश्वतीच देता येऊ नये अशी एकूण स्थिती आहे. दोन्ही बाजूने बळीराजाची गळचेपी होते आहे; पण संवेदनशीलतेने त्याकडे कुणी पाहताना दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.