न्यायडोंगरी : आमचं गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेचा अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे फज्जा उडाला या मथळ्याची बातमी लोकमतमध्ये रविवारी प्रसिद्ध होताच रविवारी सकाळीच साडेआठ वाजता सर्वच अधिकाऱ्यांनी हजेरी लावत ग्रामपालिका कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला अधिकारी अगोदर नंतर ग्रामस्थ असे चित्र पाहायला मिळाले. कार्यशाळेचे कामकाज सुरू होताच प्रभारी अधिकारी विजयालक्ष्मी अहिरे यांनी शनिवारी गैरहजर राहिल्याबद्दल व गावकऱ्यांना झालेल्या मनस्तापाविषयी माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. पुढील कामकाज शिस्तबद्ध पध्दतीने पार पडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेत सर्वप्रथम ८० सदस्याच्या संसाधन गटाची स्थापन करण्यात आली. गाव नकाशा तयार करून कामकाजाची दिशा निश्चित करण्यात आली. पहिल्या दिवशी वादग्रस्त ठरलेली आमचं गाव आमचा विकास ही योजना अखेर मार्गी लागल्याने गावकऱ्यांसह प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)
‘आमचं गाव आमचा विकास’ कार्यशाळेला अधिकाऱ्यांची उपस्थिती
By admin | Updated: July 24, 2016 22:19 IST