मालेगाव : तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी येथील पंचायत समिती प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गुरुवारी सकाळी तीन पथकांनी तालुक्यातील तिघा गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्या पंधरा जणांना ताब्यात घेतले. या पंधरा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील २४ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी गटविकास अधिकारी पिंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एल. खताळे, विस्तार अधिकारी सी. एम. थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुड मॉर्निंग पथकाने व तालुका पोलीसांनी संयुक्तरित्या तालुक्यातील मांजरे येथुन सहा, सोनज येथून चार, कौळाणे (निं) येथून पाच असे पंधरा जण उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. या पंधरा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथकात ग्रामसेवक बी. डी. कदम, के. सी. अहिरे यांचा समावेश होता. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायती यापूर्वी हगणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित २४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने कडक पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
उघड्यावर शौचास बसणाऱ्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: March 23, 2017 23:25 IST