नाशिक : मुक्त विद्यापीठाने विज्ञान विद्याशाखेंतर्गत बीएएमएसनंतरचे पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आक्षेप घेण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय शाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रम केवळ आरोग्य विज्ञान विद्यापीठच राबवू शकते आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाची जबाबदारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची असल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. गेल्या महिन्यात मुक्त विद्यापीठात झालेल्या विद्वत परिषदेने १८ नवीन अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. आगामी शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याचे ठरविले आहे. यामध्ये मुक्त विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत डिप्लोमा इन स्पोर्ट मेडिसिन, सर्टिफिकेट डिप्लोमा इन डायलेसिस क्लिनिकल असिस्टंट, तर पुण्याच्या भारत विकास शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बीएमएमसनंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत जाहीर केले होते. त्याचप्रमाणे कायचिकित्सा (जनरल मेडिसिन, आयुर्वेद), स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र (गायनाकॉलॉजी आणि आॅबस्ट्रेट्रिक्स) कौमारभृत्य (चाईल्ड हेल्थ-आयुर्वेद) हे शिक्षणक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुक्त विद्यापीठाच्या या निर्णयानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याप्रकरणी मुक्तविद्यापीठ आणि संबंधित भारत विकास शिक्षण संस्थेशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम याच संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुरू असताना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे चुकीचे असल्याची भूमिका आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतली आहे. या संदर्भातील कौन्सिलकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या, अभ्यासक्रम हे सर्व आरोग्य विद्यापीठाने यापूर्वीच केलेले असतानाही मुक्त विद्यापीठाला अभ्यासक्रम राबविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचा दावा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केला आहे.
‘मुक्त’च्या आरोग्य अभ्यासक्रमाला हरकत
By admin | Updated: October 11, 2015 21:55 IST