नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून नाशिकमधील दोन तालुक्यांतच दोन आकडी रुग्ण दररोज आढळून येत आहेत. नाशिक मनपा क्षेत्रातील उपचारार्थी रुग्णसंख्या २६५ असताना सिन्नरसारख्या केवळ एका तालुक्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ३२० वर पोहोचली आहे, तर निफाड तालुक्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील २०१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यांतील उपचारांर्थी रुग्णसंख्या मात्र दोन आकडी संख्येत कायम आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून सध्या सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातच आढळत आहेत. त्यातही सिन्नर आणि निफाड या नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांना लागून असणाऱ्या दोन तालुक्यांतच अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नाशिक ग्रामीणमध्ये ३५, बागलाण १२, चांदवड ४०, देवळा २९, दिंडोरी २६, इगतपुरी ०८, कळवण ०३, मालेगाव १३, नांदगाव ०८, निफाड २०१, पेठ ००, सिन्नर ३२०, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ११, येवला ६९ असे एकूण ७३३ बाधित रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २६७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १८, तर जिल्ह्याबाहेरील ०४ रुग्ण असून, असे एकूण ९८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९६.८९ टक्के, नाशिक शहरात ९८.१५ टक्के, मालेगावमध्ये ९७.०६ टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के असल्याने जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के इतके आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी १०२ नवीन रुग्ण आढळून आले असून, १३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर नाशिक ग्रामीणला दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६१३ वर पोहोचली आहे.
इन्फो
प्रलंबित पुन्हा हजारपार
जिल्ह्यातील कोरोना अहवाल प्रलंबित असलेल्यांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होऊन ती एक हजारावर म्हणजे १०७८ झाली आहे. त्यातही नाशिक ग्रामीणचे ५९०, नाशिक मनपाचे ३०१, मालेगाव मनपाचे १८७ इतके अहवाल प्रलंबित आहेत. अनंत चतुर्दशी आणि रविवारमुळे अहवाल प्रलंबित राहिल्याची शक्यता आहे. मात्र, हजारावर अहवाल प्रलंबित असल्याने येत्या दोन दिवसांत बाधितांच्या संख्येत अधिक भर पडण्याची चिन्हे आहेत.