’नाशिक : ऐरवी दुचाकी, चारचाकी वाहनांतून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आता चक्क सायकलवरून पेट्रोलिंग करावे लागणार आहे़ अर्थात हे पेट्रोलिंग केवळ तपोवन अर्थात साधुग्राममध्ये केले जाणार आहे़ यासाठी सुमारे पन्नास सायकलींचे वाटपही या कर्मचाऱ्यांना लवकरच केले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे़साधुग्राम परिसरात मोठ्या संख्येने साधू-महंतांचे आगमन झाले आहेत़ या साधूंच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांबरोबरच नाशिकवासीयदेखील गर्दी करीत आहेत़ येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे़ तसेच पेट्रोलिंगसाठीही विशेष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र या ठिकाणी असलेल्या गर्दीमुळे पोलिसांना दुचाकी व चारचाकी वाहनांतून पेट्रोलिंग करणे जिकिरीचे ठरते़साधुग्रामचा अवाढव्य परिसर तसेच येथील गर्दी लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांना पायी पेट्रोलिंग करणे शक्य नाही़ त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे पन्नास सायकली घेण्यात आल्या असून, त्यांचे लवकरच वाटप केले जाणार आहे़ त्यामुळे साधुग्राममध्ये सायकलवर पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचारी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको़ (प्रतिनिधी)
साधुग्राममध्ये आता सायकलद्वारे ‘पेट्रोलिंग
By admin | Updated: August 18, 2015 00:22 IST