नाशिक : साधुग्राममधील प्रमुख आखाड्यांचे ध्वजारोहण आटोपल्यानंतर आता सर्व शासकीय यंत्रणांचे पहिल्या पर्वणीकडे लक्ष लागले आहे. येत्या २९ आॅगस्टला पहिली पर्वणी असून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी सामाईक पर्वणी असल्याने प्रशासनाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हे नाशिकचे वैशिष्ट्य असले तरी प्रशासनाच्या दृष्टीने ते मोठे आव्हान ठरते. यंदा तर बदललेली स्थिती, नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या त्यामुळे गर्दीचे नियोजन हे सर्वाधिक आव्हान ठरते.यंदा तर दहशतवादी कारवायांचेदेखील मोठे आव्हान आहे. गेल्या चार वर्षांपासून कुंभमेळ्यासाठी आराखडे तयार करणे, ते सादर करणे, आवश्यक तो बदल करणे आणि मंजुरी मिळवणे इथपासून ते आता पूर्णत्वास येत असलेल्या कामांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. गेल्या १४ जुलै रोजी पुरोहित संघाच्या वतीने धर्मध्वजारोहण करण्यात आले आणि सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ झाला. प्रशासनाच्या दृष्टीने ही पूर्वतयारीच होती. रामकुंड परिसरात त्याचा अनुभव आला. त्यानंतर साधुग्राममध्ये तीन प्रमुख आखाडे आणि पाचशे खालशांचे होणारे ध्वजारोहण यंदा महापालिकेने मनावर घेतल्याने मोठ्या स्वरूपात पार पडले. साधुग्राममध्ये नियोजनाची एक रंगीत तालीम यानिमित्ताने पार पडली. आता दोन टप्पे पार पडल्यानंतर आता मुख्य पर्वणीकडे लक्ष लागून आहे.तोंडावर असलेल्या या पर्वणीसाठी नाशिक शहरात अगोदरच आठ हजार पोलीस दाखल झाले आहेत. उर्वरित चार हजार पोलीस येत्या दोन ते तीन दिवसात येणार आहेत. त्याचप्रमाणे कुंभमेळा रेल्वे येण्यास प्रारंभ झाला आहे. आता पर्वणीच्या दिवशीचे माहिती केंद्र, उपचार केंद्र, तेथील माहितगार अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्वयंसेवकांची मदत, त्यांच्यासाठी जागा निश्चिती करणे अशा प्रकारची अनेक सूक्ष्म कामे करण्यात येत आहे. याशिवाय अन्य खात्यांचे अधिकारीही नाशिकमध्ये येत असून तांत्रिक तसेच अन्य साधनांची चाचणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आता लक्ष पहिल्या पर्वणीकडे!
By admin | Updated: August 20, 2015 00:08 IST