मालेगाव- केंद्रीय लेखापरीक्षण विभागाने येथील महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त अजित जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची चर्चा रंगली आहे. सदर नोटीस निवृत्त आयुक्तांच्या नावाने असून, थेट त्यांनाच पाठविण्यात आल्याचे बोलले जाते आहे. याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नाही; मात्र मनपा प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. केंद्र सरकारच्या लेखाविभागाचे एक पथक २२ किंवा २३ मे रोजी महापालिकेत लेखापरीक्षणासाठी आले होते. महानगरपालिकेला केंद्र शासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीची लावण्यात आलेली विल्हेवाट याचा अहवाल केंद्राला सादर करण्यात न आल्याने केंद्रातर्फे हे पथक पाठविण्यात आल्याचे बोलले जाते. तीन सदस्य असलेले हे पथक तत्कालीन आयुक्त अजित जाधव यांच्या कार्यकाळात मनपात दाखल झाले होते. या पथकाने येथील मनपात सुमारे पंधरा दिवस तळ ठोकून विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यात त्यांनी एक दिवस लेखाविभागाची तपासणी करून उर्वरित सर्व दिवस बांधकाम व चारही प्रभागात कागदपत्रांची पाहणी करण्यात घालविल्याची माहिती मिळाली आहे. पंधरा दिवस पाहणी केल्यानंतर हे पथक जून २०१५ मध्ये परत गेले. या तपासणीत असंख्य कागदपत्रांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
सेवानिवृत्त आयुक्तांना बजावली नोटीस
By admin | Updated: July 13, 2015 23:36 IST