नाशिक : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदार राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये सहभागी झाल्याने ठप्प झालेल्या वितरण व्यवस्थेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात अपयशी ठरलेल्या पुरवठा खात्याने संपात सहभागी झालेल्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांनी या संपाची पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासनाला नोटीस देऊन कल्पना दिलेली असल्यामुळे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुरू होणाऱ्या या बेमुदत संपामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प होऊन त्याचे परिणाम दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब कुटुंबाना भोगावे लागणार असल्याचे माहीत असूनही जिल्हा पुरवठा खाते ढिम्म राहिले. परिणामी सोमवारी या संपाला सुरुवात झाल्यानंतर व त्यात झाडून सारे दुकानदार सहभागी झाल्यानंतर परिणाम जाणवू लागले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील किती दुकानदार या संपात सहभागी झाले त्याची माहिती गोळा केली जात असून, संपात सहभागी धान्य उचलण्याची नोटीस बजावण्याची तयारी सुरू झाली आहे.
रेशन दुकानदारांना नोटिसा
By admin | Updated: August 2, 2016 02:02 IST