नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मोटार वाहन विभागातील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराबाबतची १७ मे रोजी लेखी तक्रार पंचवटी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीमध्ये परिवहनमंत्री परब यांच्यापासून निलंबित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यासह विविध आरटीओ अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. राज्यातील आरटीओ विभागातील बदल्या, पदोन्नती, रखडलेल्या पदस्थापना यासाठी झालेले आर्थिक गैरव्यवहाराबाबतची सविस्तर तपशील तक्रारीत देण्यात आला आहे. यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनीसुद्धा या तक्रारीची गंभीर दखल घेत येत्या पाच दिवसांत याप्रकरणी चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करण्याचे आदेश या प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना दिले आहे.
तक्रारदार पाटील यांच्याकडून याबाबत चौकशीसाठी योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
---इन्फो---
चौकशी अहवालाकडे लागले लक्ष
२ तारखेपर्यंत पोलिसांना या प्रकरणाची चौकशी पूर्ण करावयाची असल्याचे त्यास वेग देण्यात आला आहे. पाटील यांची तक्रार तीन महिन्यांपूर्वीच्या प्रकरणाबाबत असल्याने पाण्डेय यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशीचे आदेश दिले आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष या चौकशीच्या अहवालाकडे लागले आहे.