नाशिक : शहरातील विविध ठिकाणी आणि प्रामुख्याने शासकीय कार्यालयांच्या परिसरात झाडांच्या बुंध्याभोवती असलेले डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक न हटविल्याने नाशिक महापालिका, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना वृक्षप्रेमींनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत.निशिकांत पगारे व जसबीरसिंग यांनी अॅड. धीरेंद्र पोेंक्षे यांच्यामार्फत ही नोटीस बजावली आहे. शहरातील अनेक वृक्षांच्या भोवती डांबरीकरण करण्यात आले, तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. झाडांचे बुंधे आवळले गेल्याने त्यांच्या पालनपोषणाला अडथळा निर्माण होतो आणि शेवटी ही झाडे उन्मळून पडतात. यासंदर्भात जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१५ रोजी बुंध्याभोवतीचे डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक तातडीने काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. इतकेच नव्हे तर वृक्षसंवर्धन व वृक्षांची योग्य ती काळजी घेणेबाबत भविष्यातही अशा प्रकारचे बांधकाम न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. परंतु त्यानंतरही महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकरोड येथील विभागीय कार्यालय, पोलीस आयुक्तालय अशा विविध ठिकाणी डांबर आणि पेव्हर ब्लॉक झाडांच्या बुंध्याजवळ असून ते पंधरा दिवसांत हटवावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांना अवमानप्रकरणी नोटीस
By admin | Updated: August 19, 2016 00:34 IST