नाशिकरोड : भारताला मजबूत बनवायचे असेल तर भारतीय अर्थव्यवस्था स्वच्छ करणे गरजेचे होते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा साठवणारी व कर न भरणारी वृत्ती मोडून काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या काळात नाशिकच्या प्रेस कामगारांनी सकारात्मक पद्धतीने केलेली चलन छपाई ही उल्लेखनीय बाब असून नोटाबंदीला चलन पुरवठ्याची साथ लाभली, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोमवारी दुपारी चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी मुद्रणालयासमोर झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० पासून समानता अमलात येईल, असे सांगितले होते. राजकीय समानता म्हणजे प्रत्येकाला एकच मत देण्याची समानता आली. मात्र सामाजिक व आर्थिक समानता येऊ शकली नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी समानतेकडे योग्य लक्ष न दिल्याने श्रीमंत आणखी श्रीमंत व गरीब आणखी गरीब होत गेला. यामुळे श्रीमंत व गरीबांमध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी बघितलेली समानता अमलात आणण्यात आणण्यासाठी व प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय असल्याचे मेघवाल म्हणाले. वर्क इज वर्शीप लेबर इज लाईफ...‘वर्क इज वर्शीप लेबर इज लाईफ’ हे मी एका पुस्तकात वाचले होते. पण ते आज मला नाशिकच्या प्रेस कामगारांमध्ये बघायला मिळाले असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काढले. कामगारांनी नोटा बंदीच्या काळात रविवारी सुट्टी न घेता दररोज जादा वेळ काम करतांना त्यांच्या कुटुंबियांनी देखील जे सहकार्य केले त्याबद्दल मेघवाल यांनी आभार मानले. कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.सातवा वेतन आयोग प्रेस कामगारांना मिळावा म्हणून मी त्यांचा वकील म्हणून काम करेन तसेच आधुनिकीकरण व पेपर प्लान्ट बाबत कमिटीचे अहवाल सकारात्मक असल्याने केंद्र शासन सकारात्मकच निर्णय घेईल असे आश्वासन मेघवाल यांनी दिल्याने प्रेस कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नोटाबंदीला नोट प्रेसच्या चलन पुरवठ्याची सकारात्मक साथ
By admin | Updated: January 3, 2017 01:05 IST