नाशिक : भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालयाने मिळकत कराच्या थकबाकी वसुलीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून, गुरुवारी (दि.२३) सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेला ३० मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी आता १३ एप्रिलला होणार आहे.केंद्र सरकारच्या या आस्थापनांचे आता महामंडळात रूपांतर झाल्याने त्यांना व्यावसायिक दराने घरपट्टी आकारण्यात आली आहे, परंतु दोन्ही प्रेसने त्यास नकार देत राज्य सरकारकडे अपील केले होते. परंतु, राज्य सरकारनेही त्यांचे अपील फेटाळून लावल्यानंतर महापालिकेने दोन्ही प्रेसला पत्र पाठवून थकबाकी भरण्याचे कळविले होते. थकबाकी न भरल्यास जप्ती वॉरंट बजावण्याचीही तयारी करण्यात आली होती. मात्र, मिळकत कराच्या कक्षेत केंद्र सरकारच्या या दोन्ही आस्थापना येत नसल्याचे सांगत आयएसपी व सीएनपी यांनी महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेवर गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिका कोणत्या आधारावर वसुली करत आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३० मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली. आता पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. (प्रतिनिधी)
नोट प्रेसच्या थकबाकीबाबत १३ एप्रिलला सुनावणी
By admin | Updated: March 24, 2017 00:27 IST